छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : जमिनीच्या व्यवहारात २ लाख रुपये टोकन म्हणून दिलेली रक्कम आताच परत कर म्हणत दोघांनी उल्कानगरी येथील एका व्यापार्याला घरात घुसून मारहाण केली. तसेच व्यापार्याच्या पत्नीसह मुलालाही मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना ६ फेब्रुवारी रोजी दुपारी वर्धमान रेसिडेन्सीत घडली. असलम खान रोशन खान पठाण आणि तैमुर गौस शेख (दोघे रा. लातूर) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेश रमेश संचेती (५२, रा. वर्धमान रेसिडेन्सी, उल्कानगरी) यांनी लातूर येथील असलम खान रोशन खान पठाण आणि तैमुर गौस शेख यांच्यासोबत जमिनीच्या व्यवहार केला होता. व्यवहारापोटी संचेती यांना या दोघांनी २ लाखांची रक्कम दिली होती. ही रक्कम वसूल करण्यासाठी ६ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास असलम व तैमूर यांनी संचेती यांचे घर गाठले. त्यावेळी संचेत घरी नव्हते. तरीही त्यांनी घरातील लोकांना शिविगाळ केली. दरम्यान, संचेती घरी आले त्यावेळी २ लाख रुपये आताच्य आताच दे म्हणून वाद घातला आणि संचेती यास लाथा बुक्क्यांनी बेद मारहाण केली. संचेती यांना मारहाण करत असताना त्यांना वाचवण्यासाठी त्यांची पत्नी व मुलाने मध्यस्थी केली. यावेळी असलम आणि तैमूर यांनी त्या दोघांनाही मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. संचेती यांनी जवाहरनगर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध तक्रार दिली. तक्रारीवरून असलम व तैमूर विरुद्ध जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.











